भाजपाचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना रावेरमधील न्यायालयाने धक्का दिला. रावेर न्यायालयाने वेळोवेळी समन्स बजावूनही अंजली दमानिया सतत अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

२०१६ मध्ये एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी भाजपाचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानियांविरूध्द रावेर फौजदारी व दिवाणी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

एकनाथ खडसे यांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची बदनामी केल्याचे हे प्रकरण आहे. दरम्यान, दमानिया या सुनावणीसाठी सतत अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात यावे, असा विनंती अर्ज भाजपाचे वकील चंद्रजित पाटील व तुषार माळी यांनी दाखल केला. या अर्जावर न्यायाधीश दिलीप मालवीय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने अंजली दमानिया यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासंबंधी आदेश दिले आहेत. न्यायालयाने पुढील सुनावणी साठी १४ मे ही तारीख दिली आहे.

[jwplayer 35hSyvuY-1o30kmL6]