राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढवाला टाकले तर तो देखील माणूस म्हणून बाहेर येतो, असे विधान भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. भाजपच्या स्थापनेत संघाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

भुसावळमध्ये बुधवारी संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला एकनाथ खडसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मंडळी उपस्थित होती. भय्याजी जोशी यांनी बापूराव मांडे यांच्या कार्याचे कौतुक केले. मांडे यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपचा विकास झाला. मांडे यांनी संघाने जबाबदारी दिल्यास ती समर्थपणे पार पाडू असे सांगितले. मात्र जबाबदारी दिली नाही तरी ते शेवटपर्यंत संघासाठीच काम करतील याची खात्री असल्याचे सांगत भय्याजी जोशींनी मांडे यांची स्तुती केली.

भय्याजी जोशींनंतर एकनाथ खडसे यांनी भाषण केले. भाजप आणि संघातील नेत्यांसमोर खडसे यांनी मनातील खंत बोलून दाखवली. हल्ली काम न करणारे जवळ येतात आणि जे काम करतात ते दुरावतात असे त्यांनी सांगितले. मांडे यांच्या कार्याचे कौतुक करताना खडसे म्हणाले, “संघाच्या शिस्तीत वाढलेले बापूराव मांडे यांच्या कार्याने आणि शिस्तीने मी प्रभावित झालो. अडचणीच्या काळात मांडे यांनीच मला मार्गदर्शन केले, असे त्यांनी आवर्जून सांगितले. बापू मांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यात शाखांचा विस्तार केला. त्यांनी सुरु केलेल्या शाखांचा फायदा भाजपलाच झाला असे त्यांनी सांगितले. नेता घडल्याने पक्ष वाढतो, त्यामुळे माझ्यामुळे पक्ष वाढला ही धारणाच चुकीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.