पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला आहे. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावांसहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पक्षाकडून आता काय कारवाई होते त्याची प्रतिक्षा आहे असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. पक्षाचं नेतृत्व करणारे यशाचे भागिदार होतात, तसंच त्यांनी अपयशाची जबाबदारीही स्वीकारावी. आमच्यावेळी देखील अपयश आलं, त्याला आम्ही तोंड दिलं आहे. ज्यांनी निर्णय घेतले त्यांनाच दोष द्यावा लागेल असे खडसे म्हणाले.  व्यवस्थित नियोजन केलं असतं तर १०५ पेक्षा जास्त आमदार निवडून आले असते असे खडसे म्हणाले.

पक्षाविरोधी कामं करणाऱ्यांची नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली आहेत, त्यांनी चौकशी करुन पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. पक्ष दोषी नसतो, नेतृत्व करणाऱ्यांच चुकतं. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले. दुर्देवावे बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होतोय असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यात सत्ता स्थापनेत अपयश आल्यानंतर पक्षातंर्गत मतभेद आता समोर येऊ लागले आहेत. नाराज नेत्यांच्या भेठीगाठी वाढल्या आहेत.

नाराज नेत्यांना एकत्र आणण्याची गरज नाही. ते आपणहूनच एकत्र येत असल्याचे खडसे म्हणाले. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी “ओबीसी असल्यानेच पंकजा यांचं खच्चीकरण केलं जात असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. स्व. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे,” प्रकाश शेंडगे म्हणाले होते. शेंडगे यांच्या आरोपानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

“पक्षातून कुणीही फुटणार नाही. पक्ष एकसंध असल्याचं भेटीला जाण्यापूर्वी खडसे म्हणाले होते. त्याचबरोबर आपण गोपीनाथ गडावरील कार्यक्रमालाही जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू असून, नेमकी चर्चा कशावर सुरू आहे, हे कळू शकले नाही.