जमीन गैरव्यवहाराप्रकरणी चुकीची माहिती दिल्याचा दावा करत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षांकडे केली. एकनाथ खडसे यांच्या या मागणीनंतर खडसे – शिवसेना हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदीच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले. या प्रकरणात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत चुकीची माहिती दिल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. सुभाष देसाईंविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करु द्यावा, अशी मागणीच त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. एकनाथ खडसे यांनी ९ जुलै २०१७ रोजी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. तोच प्रस्ताव विधानसभेत मांडण्याची परवानगी त्यांनी मागितली.

खडसे आणि शिवसेनेतील वाद काय ?
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होऊ नये, अशी आग्रही भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडले होती. युतीच्या राजकारणावर फुली मारली जावी आणि शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांच्या ताकदीची जाणीव करून द्यावी, यासाठी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून शिवसेना आणि खडसेंमधील वैर टोकाला पोहोचले आहे. जागावाटपाच्या चर्चेतही शिवसेनेशी कोणतीच तडजोड होऊ नये यासाठी खडसे आग्रही होते आणि युती तुटल्याची घोषणा करण्याचे कामही त्यांनी खुशीने अंगावर घेतले होते. फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यानंतरही, खडसे यांचा सेनाविरोध कायम होता. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप-सेना युती होणार नाही, असेही खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या काही दिवस अगोदर जाहीर करून टाकले होते.