“शिवसेनेत परत येणं जमणार नाही, असं म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये कोणाला कोणती पदं द्यावी आणि कोणाला कोणती देऊ नयेत, यात तरबेज असणारी अनेक लोकं आहेत. मलाही मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आलं होतं. परंतु तुम्हालाच मुख्यमंत्री करणार या आश्वासनावर काँग्रेसमध्ये दहा वर्षे गेली,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं. लोकसत्ता आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवादात नारायण राणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

“काँग्रेसची काही नेतेमंडळी जेव्हा भेटायला आली तेव्हा त्यांनी मला मुख्यमंत्रीपद देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. प्रत्येकवेळी केवळ मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं. पुढच्या सहा महिन्यांत तुम्हाला मुख्यमंत्रिपद देऊ असंही सांगण्यात आलं. परंतु ते काही झालं नाही. तीन ते चार वेळा मला आश्वासनं देऊनही मुख्यमंत्रीपद देण्यात आलं नाही. मला आश्वासन दिलं असतानाही एक दिवस मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली,” असं राणे म्हणाले.

२२ वर्ष या पदाला लांबून पाहिलं

“ज्या पद्धतीनं मी मुख्यमंत्रीपद हाताळलं, प्रशासन चालवलं त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी होणार नाही, असं अनेकांना वाटलं असावं. आज मी २२ वर्ष या पदाला लांबून पाहिलं,” अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोनिया गांधींबद्दल कटुता नाही

“काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. सोनिया गांधी या आजही आदर देतात. अनेकदा भेट होते तेव्हा विचापूसही करतात. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबद्दल मनात आजही कटुता नाही. पण पक्षातील काही मंडळी काही गोष्टी करण्यात तरबेज आहे. त्यामुळे आपलं भवितव्य अंधारातच आहे असं वाटलं, म्हणून मी काँग्रेसचा राजीनामा दिला,” असं राणे यांनी स्पष्ट केलं.