भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महिनाभरातच महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या राजीनाम्यानंतर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. देशमुख यांचा राजीनामा ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो… होता है क्या?, म्हणत महाजन यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.

नक्की पाहा >> Photos : सचिन वाझेंना घेऊन NIA ची टीम CSMT, कळवा स्थानकात

महाजन यांनी ट्विटरवरुन अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. महाजन यांनी एकूण पाच ट्विट केली आहे. “राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?,” असं महाजन यांनी आपल्या पहिल्याच ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुढच्याच ट्विटमध्ये देशमुख यांना न्यायालयाच्या आदेशामुळे नाचक्की झाल्याने राजीनामा द्यावा लागल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.  इतकच नाही तर त्यांनी ठाकरे सरकारचा उल्लेख वसुली सरकार असाही केलाय. “उच्च न्यायालयाने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची नाचक्की होऊन देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला आहे.
कोरोनाचे संकट असून देखील राज्यातील ह्या सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये, हे फक्त वसुली सरकार आहे,” असं महाजन म्हणालेत.

पुढील ट्विटमध्ये देशमुख यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता असंही महानज म्हणालेत. “एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती,” असं महाजन म्हणाले.

नक्की वाचा >> अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ : आजपासूनच सुरु होणार CBI चा तपास; विशेष टीम मुंबईत येणार

राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ उघडलं पडल्यानेच देशमुख यांना राजीनामा द्यावा लागल्याचा दावा महाजन यांनी केलाय. महाजन यांनी आपल्या चौथ्या ट्विटमध्ये, “मात्र निगरगट्ठ ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे,” असं म्हटलं आहे.

आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये महाजन यांनी अजून बऱ्याच गोष्टी समोर येतील असा दावा केलाय. “मात्र जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे,” असं महाजन म्हणालेत.

दोन महिन्यात दोन राजीनामे…

एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. भाजपने हे प्रकरण लावून धरल्यावर गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. यापाठोपाठ १०० कोटींच्या वसुलीबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.