News Flash

ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, ही तर ‘औरंगजेब सेना’!

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला जात असतानाच भाजपाने शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. “औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नसून आता ती औरंगजेबसेना झालेली आहे”, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“सत्तेत असूनही शिवसेना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. ज्याप्रमाणे औरंगजेबांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला बोलावून विश्वासघाताने त्यांना अटक केली, त्या औरंगजेबाप्रमाणे सध्याच्या शिवसेनेचे वर्तन आहे. शिवसेनेची बोलण्याची भाषा वेगळी असते. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र शिवसेना वेगळी भाषा वापरते. ते कसब आता शिवसेनेने अवगत करून घेतले आहे. म्हणूनच आता ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ती औरंगजेबसेना झाली आहे असे म्हणावे लागत आहे”, असे उपाध्ये म्हणाले.

आणखी वाचा- सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं; चंद्रकांत पाटलांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

“१९९५ साली महापालिकेत भाजपा-सेनेने औरंगाबाद नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळच्या युती सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दोनदा न्यायालयात नामांतर प्रस्ताव रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. आज त्याच दोन पक्षासोबत शिवसेना सत्ता चालवत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येसुद्धा भाजपा नगरसेवकांनी अनेकदा नामांतराचा प्रस्ताव दिला होता, स्मरणपत्रेही दिली होती. पण असे असूनही शिवसेनेच्या महापौरांनी त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष केले. औरंगाबादचे नामांतर करण्याची इच्छाशक्ती कधीच शिवसेनेकडे नव्हती. म्हणूनच त्यांनी ना प्रस्ताव दाखल करून घेतला, ना तो बोर्डावर आणला. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अनेकदा याबाबत प्रयत्न केले, मात्र शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेकडून कधीच सहकार्य मिळाले नाही. मतांचे राजकारण करत शिवसेनेने औरंगजेबाची वृत्ती दाखविली. शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराबाबत आपली भूमिका एकदा स्पष्ट करावी”, असं रोखठोक मत त्यांनी मांडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 4:46 pm

Web Title: bjp leader keshav upadhye angry slams uddhav thackeray led shivsena chatrapati balasaheb thackeray shivaji maharaj vjb 91
Next Stories
1 उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेस निवडणूक निधीचे २० लाख दिले ‘सीएम रिलीफ फंडा’ला
2 सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून – चंद्रकांत पाटील
3 करोनाच्या नव्या प्रकारासंबंधी राजेश टोपे यांची महत्वाची माहिती; म्हणाले…
Just Now!
X