फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला ठाण्यात मारहाण झाली होती. याप्रकऱणी तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. घटनेच्या सहा महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही ९ शी बोलताना विचारणा केली आहे की, “ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचं अपहरण केलं, घरी आणलं आणि मारहाण केली. याप्रकरणी ठाकरे सरकारने सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार?”.

एप्रिल महिन्यात मारहाण झालेल्या तरुणाची भेट घेण्यासाठी जात असताना किरीट सोमय्या यांना अटक करण्यात आली होती. किरीट सोमय्यांना मुलुंड येथील त्यांचं निवासस्थान निलम नगर येथून अटक करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला भेटण्यासाठी आपण चाललो असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

काय आहे प्रकरण ?
सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे याने जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ५ एप्रिल रोजी बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे.

माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही – आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावले होते. “माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचं समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का?,” अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली होती.