भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले आहे. सोमय्या सोमवारी कोल्हापूरला भेट देणार होते. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूरचे कागलचे आमदार मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे गुप्त ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुश्रीफ यांनी आरोप फेटाळून लावले होते.

सोमय्या सोमवारी पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याला भेट देणार होते.त्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाबाबत माहिती दिली होती. सोमय्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची भेट पाहता कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम १४४ अंतर्गत त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचे म्हटले होते.

किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. किरीट सोमय्या हे कोल्हापूर जिल्ह्यात येवू नयेत, ते कोल्हापूर जिल्हयात आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील. डॉ. किरीट सोमय्या हे कोल्हापूर वासियांना आव्हान देत आहेत, त्यांना त्याचे उत्तर कोल्हापुरी भाषेत दिले जाईल, खिंडीत गाठून गनिमी काव्याने कोल्हापूर हिसका दाखवला जाईल अशा आव्हानानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी करत जमावबंदीचे आदेश जारी केले होते.