News Flash

“पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं,” अर्णब गोस्वामींना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांचा आरोप

किरीट सोमय्या अलिबागला पोहोचले आहेत

संग्रहित

रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून अलिबागला नेलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून ठाकरे सरकारवर टीका करत आहे. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे. पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, “आपण अर्णब गोस्वामी यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, पोलीस कशा पद्धतीने दादागिरी करत आहेत हे पाहण्यासाठी आलो होतो. फक्त पाहत होतो तर पोलिसांनी उचलून मला बाजूला फेकलं याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रात कोणताही नागरिक साधं लांब उभं राहून पाहूदेखील शकत नाही. पोलिसांच्या कामात अडथळा आणला नसतानाही ही कोणती दादागिरी आहे. पत्रकारांना जेलमध्य पाठवण्याची ठाकरे सरकारची मोहीम चालवली आहे ही आणीबाणीची आठवण करुन देत असून त्याचा निषेध करतो”.

अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा-
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.

अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 3:09 pm

Web Title: bjp leader kirit somaiya on republic tv arnab goswami arrest sgy 87
Next Stories
1 “भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं आहे”
2 काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद; विधानपरिषद उमेदवारांच्या अंतिम यादीला उशीर
3 “अर्णब गोस्वामी यांची अटक काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारची मानसिकता दाखवणारी”
Just Now!
X