News Flash

भाजपा नेते किरीट सोमय्यांना अलिबाग पोलिसांनी घेतलं ताब्यात

आंदोलन करत असताना पोलिसांची कारवाई

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. किरीट सोमय्या अलिबागमध्ये आंदोलन करत असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. यावेळी ही कारवाई करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या. मात्र २०२० पर्यंत या जमिनींवरील मालमत्ता आपल्या नावावर केल्या नाहीत. बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्ष त्यांनी वापरली. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, या प्रकरणाची चौकशी करा या मागणीसाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरला होता. पोलिसांनी कारवाई करत रात्री आठच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतलं.

दुपारी पावणे बाराच्या सुमारास किरीट सोमय्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाले. नंतर त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. जमीन व्यवहाराची चौकशी करा अशी मागणी करत त्यांनी निदर्शनाला सुरुवात केली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाच जणांनाच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेता येईल असं स्पष्ट केलं. मात्र सर्व कार्यकर्त्यांना घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार यासाठी सोमय्या आग्रही होते. काही कार्यकर्त्यांनी बळजबरीने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर मधोमध ठिय्या मांडून किरीट सोमय्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली. पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता त्यांनी अडवून धरला. मात्र पोलिसांनी संयम राखत आंदोलन करण्याची त्यांना मुभा दिली. दुपारनंतर आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. सुरुवातीला मोजक्या कार्यकर्त्यांसह हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. नंतर मात्र जिल्ह्यातील विवीध भागातून भाजपा कार्यकर्ते आंदोलनासाठी दाखल होत गेले. रात्री आठ वाजता पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जोवर दिले जात नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली होती. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, रवि मुंडे तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, वैकुंठ पाटील, निलेश महाडीक, सतीश लेले, दर्शन प्रभु, पल्लवी तुळपुळे आदी उपस्थित होते.

“कोर्लईत जमीन घोटाळा झाल्याचं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं आहे. मग यात दोषी कोण आहे याची चौकशी व्हायला हवी, १२ कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली मालमत्ता २ कोटीत कशी खरेदी करण्यात आली. हे या चौकशीतून समोर यायला हवे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 8:57 pm

Web Title: bjp leader kirit somiaya taken in custody by alibaug police sgy 87
Next Stories
1 “अमित शाह यांना बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली”
2 ऊर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा
3 एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करा – राजू शेट्टी
Just Now!
X