जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे व अन्य योजना बंद करणे, निधी न देणे हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा विशेष कार्यक्रम असल्याची टीका केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. उस्मानाबाद येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“राज्यात भाजपा सरकारने जलयुक्त शिवार, पोक्रासारख्या योजना राबवून शेतकरी, कष्टकर्‍यांचा विकास करणार्‍या योजना राबविल्या. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकारने सत्तेत येताच मागील सरकारच्या योजना बंद करणे, योजनांसाठीचा निधी न देण्याचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे राज्यात सध्याच्या सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर १० हजार कोटींची घोषणा केली. मात्र त्यातील केवळ पाच हजार कोटीच शेतकर्‍यांना वाटप करण्यात येणार आहेत. राज्यात एवढेच नुकसान झाले आहे का? असा सवाल करत सरकारच्या अशा कारभारामुळे हे सरकार अधिक काळ टिकणार नाही. हे सरकार जाणार आणि पुन्हा राज्यात भाजपची सत्ता येणार हे जनतेने ठरवले आहे,” असंही दानवे म्हणाले.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वमान्य नेतृत्व होते. मात्र त्यांच्यानंतर शिवसेना पक्षाने भूमिका बदलली आहे. बाळासाहेबांना अपेक्षित हिंदुत्ववादी शिवसेना आता राहिली नाही, असंही ते म्हणाले. यावेळी माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. मिलिंद पाटील यांची उपस्थिती होती.

मराठा, ओबीसी आरक्षणावरून राजकारण

राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने कायद्यातील तरतुदीनुसार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ओबींसीच्या आरक्षणाला यापुढेही धक्का लावता येणार नाही. मात्र विरोधकांऐवजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून जनतेमध्ये संभ्रम पसरविला जात आहे. समाजाने आपल्या मागे लागावे, अशी भूमिका ठेवणार्‍या सत्तेतील नेत्यांची भूमिका चुकीची असल्याचे दानवे यांनी सांगितले.

पुन्हा भाजपची सत्ता येणार

“सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या मागील दोन वर्षांतील कारभारावर राज्यातील जनता प्रचंड नाराज आहे. कोरोना काळातील परिस्थिती, अतिवृष्टी काळातील नुकसान भरपाईबाबत सरकारने आखडता हात घेतल्याने नाराजी आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार जाणार आणि भाजपची सत्ता येणार,” असा दावाही केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यावेळी केला.