ज्या ज्या ठिकाणी तबलिगी जमातचे लोक आहे त्या त्या ठिकाणी करोना असणारचं असं वक्तव्य भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. तबलिगी जमातच्या काही लोकांमुळे अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रसार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावर त्यांनी टीका केली आहे.

दिल्ली विमानतळावर आठ तबलिगींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तबलिगी आहे तर करोना आहे. कधीही कुठेही, अशा आशयाचं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यांनी या परिस्थितीवर आपल्या ट्विटरवरून टीका केली आहे.

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या २२ हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सह-सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली होती. तसंच तबलिगी जमातशी संबंधित रुग्ण १७ राज्यांमध्ये सापडले असून अद्यापही ट्रेसिंग सुरु आहे. कार्यक्रमाशी संबंधित हजारो पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. हे आमच्यासाठी रोज एका युद्धाप्रमाणे असून एकही व्यक्ती सोडली जाऊ शकत नाही. देशवासियांनीही आम्हाला यामध्ये सहकार्य केलं पाहिजं असं आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं होतं.

आणखी वाचा- तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा, मुस्लीम सत्यशोधक मंडळाची मागणी

करोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९ टक्के रुग्ण ० ते २० वयोगटातील आहेत. तर ४२ टक्के रुग्ण २१ ते ४० वयोगटातील आहेत. ४१ ते ६० वयोगटातील रुग्णांची संख्या ३३ टक्के असून ६० च्या पुढील रुग्णांची संख्या १७ टक्के असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं होतं.