मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश नुकताच दिला आहे. मात्र यामुळे विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपाने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सध्या सुरु असून…घाई करा थोडेच दिवस बाकी आहेत असा टोला भाजपा मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी आता दाऊदलाही क्लीन चीट मिळेल असाही टोला लगावला आहे.

मोहित भारतीय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सूत्र: दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आणि लवकरच महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चीट देणार आहे. कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे. घाई करा…थोडेच दिवस बाकी आहेत”.

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे
नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ७२ जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला. नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा तत्कालीन भाजपा सरकारने केल्यानंतर सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने त्यास विरोध केला होता. स्थानिकांचा या प्रकल्पास विरोध असल्याने प्रकल्प लादू नये, अशी भूमिका घेत स्थानिक आंदोलकांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीआधी युती जाहीर करताना नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याची अट शिवसेनेने घातली होती. नाणारमध्ये शिवसेनेचा मेळावा घेऊन प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी आरे कारशेडसाठी झाडे तोडण्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली. नाणारसंदर्भात आमदार राजन साळवी यांच्यासह ३३ जण, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांच्यासह १६ जणांविरोधात पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. अशोक वालम यांच्यासह आंदोलनात सहभागी २३ जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिला.