मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार झेप नाही त्यामुळे मध्यावधी निवडणूक होईल हे निश्चित आहे असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पदावर रहायचं नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. सत्तेसाठी जी लाचारी पत्करली आहे ते शिवसैनिकांना आवडलं नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा कोकण दौरा केला. मात्र या दौऱ्यात त्यांनी कोकणाला काहीही दिले नाही. त्यांचा सगळा दौरा हेलिकॉप्टरने होता. रत्नागिरीच्या नाणार प्रकल्पाविषयी त्यांनी एकही शब्द काढला नाही अशीही टीका राणेंनी केली.

“कोकणात मच्छिमारांची उपासमार होते आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. वृत्तपत्रांनी दोन दिवस त्यांना नाहक प्रसिद्धी दिली. मी विरोधाला विरोध करायचा म्हणून बोलत नाही. मी कोकणी माणसासाठी बोलतो आहे. कोकणासाठी आणि कोकणी माणसासाठी उद्धव ठाकरेंचे योगदान काय? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला.

“सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी ओळखला जातो. मात्र या जिल्ह्याला किती निधी मिळाला तेदेखील उद्धव ठाकरेंनी सांगितले नाही. कोणत्याही योजनेला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला नाही. कोकणासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसून मुख्यमंत्री परत गेले.” अशीही टीका नारायण राणेंनी केली.