महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाल्याचा दावा या तीन पक्षांकडून केला जातो आहे. अशात भाजपा खासदार नारायण राणे यांनी मात्र एक सूचक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता ऑन द वे आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मी या संदर्भात आशावादी आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडलं. शिवसेना सत्तेवर असली तरी खरी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे असाही दावा त्यांनी केला.

जयंत पाटील मुख्यमंत्री आहेत की उद्धव ठाकरे?
याच मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही टीका केली. या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की जयंत पाटील? असा प्रश्नही नारायण राणे यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं जयंत पाटीलच देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या बाजूला जयंत पाटील यांची खुर्ची आहे असाही दावा नारायण राणेंनी केला.

सुभाष देसाईंवरही टीका
युतीची सत्ता होती तेव्हाही सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग मंत्री पद होते. आत्ताही तेच मंत्रिपद त्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्योग सुरुही तेच करतात आणि बंदही तेच करतात, यालाच शिवसेना म्हणतात असंही राणेंनी स्पष्ट केलं.