राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाची घटनापीठापुढे सुनावणी करण्यात आली होती. परंतु यानंतरही मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली. दरम्यान, यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यातच मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत मराठा समाजाच्या इच्छुक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गासाठींच्या कोटय़ातून (ईएसडब्ल्यू) शैक्षणिक लाभ घेण्यास परवानगी द्यावी याबाबत जनहित याचिका करण्यात आलेली असून उच्च न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास सोमवारी नकार दिला. यानंतर मराठा आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चाकडून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एका एसटी बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितल्याचा प्रकार सोमवारी समोर आला होता. यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

आणखी वाचा- “महाराष्ट्रात मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर…”; मनसेच्या आमदाराचे ठाकरे सरकारला पत्र

“स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा जेंडा काढण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणली. महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?,” असा सवाल भाजपा नेते निलेश राणे यांनी केला. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला. ठाण्यातील आनंदनगर येथून मुंबईच्या दिशेनं दात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितला होता. त्यानंतर एसटी चालकानं हा झेंडा काढल्याचा प्रकार घडला होता.

आणखी वाचा- चर्चा न करता कामकाज उरकणं हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती- देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटलांकडूनही टीका

“भगवा काढून बस रवाना केली. हे धक्कादायक आहे. हे कोणत्या प्रकारचं राजकारण सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार या दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल. काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते. मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती. महाराष्ट्रातील जनता याचं उत्तर नक्कीच देईल,” असं म्हणत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणी जोरदार टीका केली.