देशात सध्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरूवारीदेखील राज्या २३ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे गुरूवारच्या आकडेवारीनुसार करोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला ‘करून दाखवलं’ असं म्हणत टोला लगावला आहे.

“करून दाखवलं… कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी. रुग्णसंख्या १० लाखांच्या जवळ. हे सरकार विसरलं की करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही,” असं म्हणत राणे यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर हल्लाबोल केला.

आपल्याला करोनाशी लढायचंय – फडणवीस

“या सरकारला आता करोना नाही कंगनाशी लढायचं आहे असं वाटतंय. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यांना कोणती चौकशी करायची आहे ते करु शकतात. कंगनानेही ते सांगितलं आहे. पण कुठेतरी गांभीर्याने करोनाकडे लक्ष द्या. जितक्या तत्परतेने कंगनाची चौकशी करु वैगेरे सुर आहे त्यापेक्षा जास्त करोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यातील ५० टक्के क्षमता तरी करोनाशी लढण्यात वापरा, कदाचित लोकांचा जीव वाचवण्यात मदत मिळेल,” असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रात रोज करोनाचा आकडा वाढत आहे. देशातील ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. पण करोनासोबत लढायचं सोडून सरकार कंगनाशी लढत आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. “कंगनाचा मुद्दा भाजपाने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर जाईल इतकं महत्त्व कशाला दिलं. तुम्ही जाऊन तिचं घर तोडलं,” असं सांगत फडणवीसांनी कंगना भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप फेटाळला.