News Flash

लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा

वाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे जबरदस्त चपराक म्हणत पवारांनी भाजपाला लगावला होता टोला

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपाचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला होता. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

“वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते पवार?

“अमरावतीची जागा जिंकली असती तर समाधान मिळालं असतं. तिथं जे घडलं त्याचं दुःख असल्याची खंत अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवली. “नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा विजय आहे. राज्यातील जनतेचा सरकारवरील विश्वास असल्याचे हे प्रतीक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार! महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजय लवकरच जाहीर होईल”, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 8:02 am

Web Title: bjp leader nilesh rane criticize ncp leader deputy cm ajit pawar over vidhan parishad election results jud 87
Next Stories
1 एकटेच लढणार आणि जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली; शिवसेनेचा टोला
2 विधान परिषद निवडणूक : भाजपला धक्का
3 मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन
Just Now!
X