शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी ८ वा स्मृतीदिन होता. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. परंतु करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्याव्यात, असं आवाहन केलं होतं. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृतीस्थळावर गेले होते. त्यानंत माध्यमांशी संवाद साधताना “आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील,” असं ते म्हणाले होते. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी राऊतांना टोला लगावला.

“संजय राऊत हे नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात,” असं म्हणत निलेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला. राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा- बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्वीटही केलं नाही; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

काय म्हणाले होते राऊत?

“आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहिल,” असं हिंदुत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले. “गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती. लोकांच्या मनात शंका होत्या. पण आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळार शिवसेनेचा मुख्यमंत्री तेदेखील उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहिल. पण बाळासाहेब आमच्यासोबत आहेत आणि सतत राहतील, प्रेरणा देतील असा विश्वास आहे,” असं त्यांनी सांगितलं.