शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मृतीदिन आहे. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. परंतु करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्याव्यात, असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलं नाही. यावरून मनसेनं सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

“बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात. पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरलेलं नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन,” असं म्हणत नाव न घेता निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा- बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना सोडलेल्यांनी स्मारकावर बोलू नये; शिवसेनेचा मनसेला टोला

मनसेचीही टीका

बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलं नाही. यावरून आता मनसेनं सरकारवर टीका केली आहे. “स्मारक की मातोश्री ३?” असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

आणखी वाचा- बाळासाहेबांचं स्मारक की मातोश्री तीन?; मनसेचा सवाल

“महापौर बंगला घेऊन आता तीन वर्ष होत आली. परंतू हा बंगला अजूनही बंदीस्तच आहे. २३ जानेवारी आलं किंवा १७ नोव्हेंबर आलं तर निविदा काढल्यात, काम सुरू आहे इतक्याच बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. खरोखर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदीस्त का आहे. ते जनेसाठी का खुलं नाही? जनतेला त्या ठिकाणी का जाता येत नाही?, कोणाची खासगी मालमत्ता असल्यासारखं ते का वापरलं जातंय?,” असे सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले.