Advertisement

“भास्कर जाधव, २०२४ला दाखवून देऊ”, ‘त्या’ विधानावरून निलेश राणे यांचा पलटवार!

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आता निलेश राणे यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेवर आता नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी परखड शब्दांमध्ये भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिलं आहे. “नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं कुणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असंच प्रत्येक आई-बापाला वाटत असेल”, असं भास्कर जाधव म्हणाले होते. त्यावरून आता राणे पुत्र संतप्त झाले असून त्यांनी देखील तेवढ्यात आक्रमकपणे भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणाऱ्या भास्कर जाधव यांनी कुणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये”, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच, २०२४च्या निवडणुकी दाखवून देऊ, असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे.

“सतराशेसाठ जरी आले, तरी…!”

भाजपा नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ट्वीट करत भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे. “भास्कर जाधव, तुमची औकात २०२४ ला दाखवून देऊ. वाळू चोर भास्कर जाधव, तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले, तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत. कुत्र्यासारखं भुंकत बसणं आणि समाजाला काही न देता नुसतं रडत बसणं हे तुमचं राजकारण लवकरच संपणार”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

 

“भास्कर जाधव यांनी संस्कृतीवर बोलू नये”

निलेश राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा आणि महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने ट्वीटरवरून टीका केली आहे. त्यासंदर्भात भास्कर जाधव यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना टीका केली होती. त्यावर बोलताना निलेश राणे ट्वीटमध्ये म्हणतात, “स्वत:च्या गावाच्या मंदिरात गावकऱ्यांना शिव्या घालणारे, मदत मागायला आलेल्या महिलेला मारायला जाणारे, स्वत:चा एकही रुपया चिपळूण शहराच्या विकासासाठी न वापरणारे भास्कर जाधव यांनी कुणाच्या संस्कृतीबद्दल बोलू नये, भास्कर जाधव यांनी एक वस्तू दाखवावी जी त्यांनी कोकणाला स्वखर्चातून दिली”, असं देखील निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

“स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाही म्हणून…”

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे. “नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाहीए. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

21
READ IN APP
X
X