भाजपाचे नेते नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. तसंच नाणार रायगडमध्ये होण्यासाठी चर्चा होत नसून तो राजापूरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले होते. शिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे, असं म्हणत पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना उपनेत्याच्या मुलाची ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून चौकशी असं वृत्त एका वृत्तपत्रात छापून आलं आहे. त्या वृत्तपत्रातील वृत्ताच्या आधारावर राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती‘… शिवसेनेचा अंत जवळ आलाय,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

आणखी वाचा- “नाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी बैठका सुरु,” निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

यापूर्वी बुधवारीही पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. “नाणारचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार नेहमी बोलत असतात. पण नाणारची एक कमिटी जी प्रकल्प आणू पाहत आहे, ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करत आहे. प्रकल्प रद्द झाला आहे तर मग ती चर्चा कशासाठी होत आहे ? प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी ही चर्चा होत नाही. राजापूरमध्ये प्रकल्प आणावा यासाठी ही चर्चा होत आहे. नाणार राजापूरमध्ये परत कसं आणलं जावं यासाठी एकत्र येऊन योजना आखली जात आहे,” असं निलेश राणेंनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- “इतके जवान पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यात मारले नव्हते,” भिवंडी दुर्घटनेवरुन कंगनाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाची एक कंपनी असून निशांत देशमुख संचालकांपैकी एक आहेत. निशांत देशमुख मुख्यमंत्र्यांचा मावशीचा मुलगा आहे. त्याचा जवळपास १४०० एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचाच नातेवाईक निघाला आणि युतीच्या काळात हे लोक मुखवटा घालून फिरत होते, लोकांना भडकवत होते. यांनी कुटुंबातील व्यक्ती जमिनीचा व्यवहार करत असताना यांनी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली,” अशी टीका निलेश राणे यांनी केली. “नाणार प्रकल्प जाहीर झाल्यानंतर आम्ही काही जमीन घोटाळे समोर आणले होते. संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हेही दाखल झाले होते. आता तर सत्ता आली आहे. राजापूरला याच सरकारने एमआयडीसी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे हात जमिनीच्या लूटमारीमध्ये बरबटले आहेत,” असा आरोप निलेश राणे यांनी केला होता.