माजी खासदान निलेश राणे यांनी करोनावर मात केली आहे. निलेश राणेंचा करोना अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांनी स्वतः याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. माझी करोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असं निलेश राणेंनी म्हटलंय.

१६ ऑगस्ट रोजी निलेश राणेंचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यावेळीही त्यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती होती. अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर निलेश राणे तात्काळ आपल्या मुंबईतील घरात सेल्फ क्वारंटाइन झाले होते. याचसोबत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं.

२००९ साली निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०१४ साली त्यांना शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. २०१९ मध्ये राणे कुटुंबियांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर निलेश राणे हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. महाविकास आघाडी आणि विशेषकरुन शिवसेनेवर निलेश राणे नेहमी टीका करत असतात.