तसंही शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. तर यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनीही कर्ज भरू नये असं म्हणत भाजपा नेते नितेश राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राज्याच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगत कर्ज माफ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नितेश राणे यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जाच्या यादीत कोकणातल्या एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. कारण कोकणातील शेतकरी आपले १०० टक्के कर्ज  भरतात. त्यांचं कर्ज थकीत राहत नाही. मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय. मग यापुढे कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये. तसेही माफ होणारच आहे, अशा आशयाचं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

सरकारकडून कर्जमाफीची यादी जाहीर
महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जाहीर केली. पहिल्या यादीत ६८ गावांमधील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा – १५ हजार ३५८ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी

आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करून मार्च-एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे जाहीर केले होते. पहिली यादी २४ फेब्रुवारीला म्हणजे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी ३४ लाख ८३ हजार ५०८ शेतक ऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलेली ही पीक कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जासाठी आहे. या योजनेसाठी सुरुवातीला आकस्मिकता निधीत १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.