“जवळपास ५० दिवस होत आले. तरी अडकलेल्या लोकांना परत कसं पाठवायचे हे अजून सरकारला कळलेलं नाही. कलानगरची सीट घालवणारे परिवहन मंत्री अनिल परब हे निष्क्रिय आहेत,” अशी टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे. “परराज्यातील मजुरांना जसं त्यांच्या गावी पाठवण्यात येत आहे, तसंच राज्यात अडकलेल्या लोकांनाही घरी जाण्यासाठी एसटीच्या माध्यमातून विचार सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल,” असं परब म्हणाले होते. यावरून राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

“जवळपास ५० दिवस होत आले. तरी अडकलेल्या लोकांना परत कसं पाठवायचे हे अजून सरकारला कळलेलं नाही. कलानगरची सीट घालवणारे परिवहन मंत्री अनिल परब हे निष्क्रिय आहेत. आपली लोकं गेली ५० दिवस तडफडत आहेत. पण राज्य सरकारला परराज्यातील लोकांसाठी वेळ आहे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकंसाठी नाही,” असं राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आणखी वाचा- मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार; सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

काय म्हणाले अनिल परब?

“लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. महाराष्ट्र शासन त्या लोकांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु त्याबाबतीत एक शिस्त पाळणं गरजेचं आहे. आम्ही त्यासाठी काही व्यवस्था करत आहोत,” अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका मराठी वाहिनीशी बोलताना दिली होती. “जसं परराज्यातील लोकांच्या याद्या तयार करून परवानगी घेऊन त्यांना पाठवलं. त्याच पद्धतीनं जे राज्यातील लोक इतर ठिकाणी अडकले आहेत त्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही व्यवस्था एसटी महामंडळामार्फत व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. यासंदर्भात राज्य शासन चर्चा करत आहे. वेगवेगळे पोर्टल्सही यावर काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.