शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी ८ वा स्मृतीदिन होता. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. परंतु करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्याव्यात, असं आवाहन केलं होतं. दरम्यान, अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्वीटही केलं नाही, असं म्हणत भाजपा नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. तर अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “संपूर्ण दिवस संपला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काँग्रेसश्रेष्ठींकडून एकही संदेश किंवा ट्वीट करण्यात आलेलं नाही. जर बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेतली जात नसेल तर शिवसेनेकडे उरलंच काय?,” असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.

आणखी वाचा- …तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी नारायण राणेंचं वक्तव्य

आणखी वाचा- नेलकटरला घाबरतात आणि वार्ता तलवारीच्या; निलेश राणेंचा राऊतांना टोला

निलेश राणेंकडूनही ट्वीट

“बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात. पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरलेलं नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही… स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन,” असं म्हणत नाव न घेता निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली होती.