सध्या राज्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसंच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना मोठी बिलं दिल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून समोर आल्या होत्या. दरम्यान, भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी राज्यातील कोविड रुग्णालयं सक्तीनं कॅशलेस करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं आहे.

“करोना महामारीवर सध्या कोणता ठोस उपाय आलेला नाही, तसंच गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन हा एकमेव पर्याय राबवला जात आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश लोकांचा रोजगार गेला आहे. ज्यांच्याकडे रोजगार आहे त्यांना तो कपात होऊन मिळत आहे. काही ठराविक कंपन्याच आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देत आहेत. अशा परिस्थितीत जे करोनाबाधिक रुग्ण होत आहेत त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे,” असं राणे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण…”

“आरोग्यविमा असूनही कोविड रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधा देण्यात येत नाहीत. आरोग्य विम्यामध्ये किट आणि निर्जंतुकीकरणाचे पैसे ग्राह्य धरले जात नाही, खासगी कोविड रुग्णालयांमध्ये दाखल होताना ५० हजार ते १ लाखांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागते, काही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनची व्यवस्था करण्यास सांगतात त्यामुळे त्यांचे नातेवाईकही बाधित होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे,” असं म्हणत त्यांनी अनेक प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, कोविड रुग्णालयं सक्तिनं कॅशलेस करण्यात यावीत आणि किट तसंच निर्जंतुकीकरणाचे पैसे आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट करण्याचे संबंधितांना आदेश द्यावे, अशी विनंतीही त्यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली आहे.