भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा २६ जुलै रोजी वाढदिवस पार पडला. २०१९ विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना आपले भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरीही पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांचं जाळं मोठं आहे. आपल्या वाढदिवशी करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कोणीही भेटायला येऊ नये असं आवाहन पंकजा यांनी केलं होतं. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते केरबा पाटील यांना त्यांच्या वाढदिवशी कन्यारत्न प्राप्त झालं.

आपल्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंच्या वाढदिवशीच कन्यारत्न झाल्यामुळे आनंद द्विगुणीत झालेल्या केरबा पाटील यांनी आपल्या मुलीचं नाव पंकजा असं ठेवलं आहे. केरबा पाटील यांनी ही गोड बातमी ट्विटरवर दिली. ज्यावर पंकजा मुंडेंनीही आपल्या कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी होत नवजात मुलीला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत.

दरम्यान पंकजा मुंडेंनीही आपल्या वाढदिवशी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतची एक जुनी आठवण ट्विटरवर शेअर केली आहे.

निवडणुकीत पराभव झालेल्या पंकजा मुंडे काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणातून दूर फेकल्या गेल्या होत्या. यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकडा मुंडे यांची केंद्रीय कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.