News Flash

पंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत?

फेसबूक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या. मात्र बहुमतासाठीच्या जागा कमी पडल्यानंतर आणि शिवसेनेशी मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा फिस्कटल्यानंतर….भाजपाला सत्ता गमवावी लागली. निवडणुकीमध्येही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना पराभवाचा सामना करायला लागला. माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्यात हक्काच्या परळी मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत बाजी मारली.

राज्यातली सत्ता गमावल्यानंतर, देवेंद्र फडणवीसांवर मुळ कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातील उमेदवारांना जागा दिल्याचा आरोप होतो आहे. अशातच पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केल्याच्या चर्चा आहेत. रविवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहली आहे, ज्यामुळे पंकजा भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का?? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे वाचा सविस्तर –

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे…

निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.
‘आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!

पंकजा मुंडे यांच्या या फेकबूक पोस्टमुळे त्या भाजपाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे १२ तारखेला भगवानगडावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 10:54 am

Web Title: bjp leader pankaja munde is likely planning to quit bjp her facebook post add speculation in political scenario psd 91
टॅग : Bjp,Pankaja Munde
Next Stories
1 ‘आरे’मध्ये येताना पाच झाडं तरी घेऊन या – सयाजी शिंदे
2 विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील – छगन भुजबळ
3 महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना नितेश राणेंचं बोचरं ट्विट
Just Now!
X