मी निवडणुकीत कशी पडले हे पुस्तक लिहिन तेव्हा कळेल. माझ्या बंडाच्या बातम्या कोणी पेरल्या हे शोधलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. परंतु मला पद मिळू नये म्हणून हे कारस्थान केलं गेलं का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मला कोअर कमिटीतून मुक्त करा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी यावेळी केली. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं. गोपीनाथ मुंडेंचा प्रवास मृत्यूनंतरही कायम आहे ही किमया आहे. सामान्य माणसाचा, वंचितांचा नेता म्हणून त्यांच्याकडे आजही आदराने पाहिलं जातं, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

“शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते आणि मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

“पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली याचा शोध घ्यावा,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितलं. “मी पक्ष सोडणार की नाही याचं उत्तर पक्षानं द्यावं. ते दिलं तरी लोकांच्या मनात शंका आहे. पंकजा मुंडे दबाब आणत असल्याचं काहीजण म्हणत आहेत,” असं मुंडे यावेळी म्हणाल्या.