News Flash

हिंगणघाट जळीतकांड: “महाराष्ट्रात कांग्रेस सरकारच्या कार्यकाळात जंगलराज सुरु आहे का?”

हिंगणघाट येथे जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संताप

हिंगणघाट जळीतकांडानंतर काँग्रेसवर निशाणा

वर्ध्यामधील हिंगणघाट येथे जळीतकांडामध्ये गंभीर जखमी झालेल्या पिडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. मुलीच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिच्या वडिलांनी आरोपीला आमच्या स्वाधीन करावे अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायलयामध्ये होऊन जलदगतीनं हा खटला चालवण्यात यावा. या प्रकरणातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी सोशल मिडियावरुन होताना दिसत आहे. अशातच आता भाजपाच्या एका नेत्याने थेट “महाराष्ट्रामध्ये कांग्रेस सरकारच्या कार्यकाळात जंगलराज सुरु आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले आहेत भाजपाचे मंत्री?

हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख असणाऱ्या प्रवीण अलई यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अलई यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे जुने ट्विट कोट करुन रिट्विट करत आपले मत नोंदवले आहे. “महाराष्ट्रातील हिंगणघाट येथील शिक्षिकेला विकेश नगराळेने पेट्रोल टाकून जाळले. आज या तरुणीचा दु:खद मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये कांग्रेस सरकारच्या कार्यकाळात जंगलराज सुरु आहे का?,” असा सवाल अलई यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी?

प्रियंका गांधी यांनी ५ फेब्रुवारी रोजी ट्विटवरुन उत्तर प्रदेश सरकारवर महिलांसंदर्भातील गुन्ह्यांवरुन निशाणा साधला होता. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची वक्तव्य करुन पोटं भरली असतील तर त्यांनी वास्तव समजून घ्यावे. आधी रायबरेलीमध्ये एका तरुणीची हत्या करुन तिला जाळून टाकण्यात आलं आणि आता आझमगडमध्ये एका तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळून टाकण्यात आलं. हे वास्तव आहे आणि भाजपा अपराधमुक्त राज्याचा डंका वाजवत आहे,” अशी टीका प्रियंका यांनी ट्विटवरुन केली होती.

 

शांतता राखण्याचं आवाहन

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या भावाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तर वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनीही शांतता राखण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. “नागरिकांनी शांतता राखावी, कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु,” असं भीमनवार यांनी सांगितलं आहे. तर या घटनेनंतर समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 10:28 am

Web Title: bjp leader pravin alai slams congress over hinganghat victim death scsg 91
Next Stories
1 लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही; धनंजय मुंडेंनी दिला इशारा
2 हिंगणघाट जळीतकांड: पीडितेच्या मृत्यूनंतर नेतेही संतापले; म्हणाले…
3 हा मृत्यू नव्हे, हत्याच; हिंगणघाट जळीतकांडावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया
Just Now!
X