राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सोमवारपासून एस. टी. सेवा सुरु करण्यात येणार आहे. हा प्रवास मोफत असणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. करोना आणि लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेले लोक, विद्यार्थी, मजूर या सगळ्यांसाठी ही एसटी सेवा असणार आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रातल्या लोकांना हा प्रवास करता येणार नाही. यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु या सेवेचा लाभ प्ररप्रांतीयांनाच घेता येणार असल्याचं भाजपानं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “भूमीपुत्रांविषयी पुतनामावशीचं प्रेम उघड झालं आहे,” असं म्हणत भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला.

या एसटी बसेसद्वारे प्रवासी राज्याच्या सीमेपर्यंत प्रवास करू शकणार आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन खात्यानं दोन नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार इतर राज्यातील जे मजूर किंवा इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असतील, त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंतच पोहोचवलं जाणार आहे. तसंच महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर किंवा इतर व्यक्ती, जे इतर राज्यांमधून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेले आहेत, त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवलं जाईल, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. तसंच राज्य सरकारतर्फे १० मे रोजी “शासन निर्णय बदलून ही सुविधा केवळ मजुरांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे,” असा दावा भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता.

त्यानंतर आता भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “परप्रांतीय मजुरांना रेल्वेने मोफत नेण्याची मागणी करणारे आता स्थानिकांना एसटीने मोफत का नेऊ शकत नाहीत? स्थानिक भूमिपुत्रांविषयीचं पुतना मावशीचं प्रेम उघड झालं!” असं म्हत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.