बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असून त्यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, यानंतर उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन केलं आहे असं म्हणत भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

आणखी वाचा- उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना प्रवेशावरुन प्रितम मुंडेंचा टोला, म्हणाल्या….

“पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे, परंतु प्रवेश देत असताना उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना जी उपमा दिली आणि ज्या रस्त्यावर आंदोलनात आघाडीवर असायच्या, तसेच ज्या घरादाराची पर्वा न करता शिवसेनेच्या वाढीसाठी लढवैय्या कार्यकत्या म्हणून काम केलं त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा प्रकार आहे,” असं दरेकर म्हणाले.

आणखी वाचा- बॉलिवूडमध्ये घाटी संबोधलं जाण्यापासून ते शिवसैनिक; असा आहे उर्मिला मातोंडकरांचा संघर्ष

“शिवसेनेच बदलते स्वरूप दिसतं आहे. प्रियंका चतुर्वेदी यांना खासदार केलं. आज ज्या राज्यात सत्तेत काँग्रेस आहे त्या काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवेलेल्या उमेदवाराला पक्षात प्रवेश दिला जात आहे. पक्षाची मूळ विचारधारा, आज यापलीकडे जाऊन काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरताना दिसत आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ज्या शिवसेनेच्या महिला आघाडीने शिवसेनेचे जीवापाड काम केलं, उदाहरणार्थ मीना कांबळी, उमेशा पवार, सुधाताई चुरी यांनी शिवसेनेसाठी रस्त्यावर काम केलं. त्यांचा शिवसेनाप्रमुखांनी सन्मान केला होता. परंतु आता उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने एका अर्थाने अवमूल्यन केलं असल्याचंही दरेकर म्हणाले.