सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावला. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी केला. त्यावरून भाजपाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंना टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसले यांना निवासस्थानी बोलावून त्यांचा सत्कार केला. तसेच, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले यांचा शासकीय निवासस्थानी बोलावून सन्मान केला. याबाबत बोलताना दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “मुख्यमंत्री महोदय, शिक्षणमंत्री महोदया, (आपण दोघे) थोडे कष्ट घेऊन परितेवाडी-बार्शी गाठली असती आणि डिसले गुरुजींचा सत्कार केला असता, तर तो खऱ्या अर्थाने गुरुजींचा, त्यांच्या कुटुंबाचा, शाळेचा, विद्यार्थ्यांचा, त्या परिसराचा सत्कार ठरला असता. जागतिक पातळीवर ज्यांनी राज्याचं नाव रोशन केलं, त्या सत्कारमूर्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून केलेला सत्कार म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरली”, अशी टीका त्यांनी केली.
त्या सत्कारमूर्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून केलेला सत्कार म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरली.
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 8, 2020
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली. जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. यामुळे ९ देशांमधल्या हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल, असं डिसले म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 7:01 pm