News Flash

अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मसाज करणारे आंदोलक यापूर्वी पाहिले नाहीत : प्रवीण दरेकर

शेतकरी आंदोलनाच्या विश्वासर्हतेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

(फोटो सौजन्य : Twitter/mipravindarekar आणि Facebook/khalsaaidindia13 वरुन साभार)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिल्लीच्या सीमेजवळ सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेजवळ सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये दलाल, भांडवलदार आणि अडत्यांचा समावेश असल्याची टीका दरेकर यांनी केलीय. तसेच अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मजास करुन घेणार आंदोलक देशाने यापूर्वी कधी पाहिले नाहीत अशी टीका दरेकर यांनी केली आहे. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

राजू शेट्टींवर साधला निशाणा

गुरुवारी दरेकर यांनी इचलकरंजीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . त्यावेळी त्यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र आता त्यांना राजकारणातच जास्त रस असल्याचा टोला दरकेरांनी लगावला. शेट्टी हे कोणत्या जगात वावरत आहेत?, असा प्रश्नही दरेकरांनी उपस्थित केला. शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्या गेल्याने त्याची डागडुजी करण्याची गरज शेट्टींना आहे. त्यांची शेतकरी नेता ही ओळख पुसली गेलीय, अशा शब्दांमध्ये दरेकरांनी शेट्टींवर हल्लाबोल केला. शेट्टी हे स्वत:ला अजूनही शेतकरी नेते समजतात हे त्यांच्या डोक्यातील खूळ असल्याचा टोलाही दरेकरांनी यावेळी लगावला. शेतकऱ्यांचा शेट्टींवर विश्वास राहिलेला नसून त्यांचे लक्ष्य आता फक्त विधानपरिषदेच्या आमदाराकीकडे आहे. सत्य स्वीकारणाचे धाडस शेट्टींमध्ये नाही, असा टोलाही दरेकरांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> नऊ लाख शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन!; काँग्रेस सत्तेत असणाऱ्या ‘या’ राज्याने दिलं कर्जमाफीचं गिफ्ट

महाविकास आघाडी सरकारने केवळ खोटी आश्वासने दिली

तसेच शुक्रवारी रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चातर्फे चंदूर (ता. हातकणगले) येथे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर किसान यात्रेच्या निमित्ताने सभेत दिलेल्या भाषणामधुनही दरेकर यांनी पुन्हा शेट्टींवर निशाणा साधल्याचे दिसून आलं. शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा करू नये. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये व बागायतीसाठी ५० हजार रुपये देण्याच्या वचनाचे काय झाले. शेतकऱ्यांना चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले याचेही उत्तर जनतेला द्या, असा सणसणीत टोला दरेकर यांनी शेट्टी यांना लगावला. आपल्या भाषणामध्ये देरकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारने केवळ खोटी आश्वासने दिल्याची टीकाही केली.

नक्की वाचा >> “जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत कोणतीही कॉर्पोरेट कंपनी…”; शाह यांनी शेतकऱ्यांना दिला शब्द

…पण अख्खा भाजपा बांधावर जाऊन संवाद साधतोय

शरद जोशी नेहमी सांगायचे, ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या पायातील बेडय़ा निघतील, त्या दिवशी शेतकरी सुखी होईल. तेच धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अबलंबिले आहे, असे नमूद करून दरेकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या गोष्टी आम्हाला करतात, पण अख्खा भाजपा बांधावर जाऊन संवाद साधत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावर जायची भीती नाही, शेतकरी आमचा आहे. जे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते व नंतर आपलेच वचन विसरले, त्यांना आधी विचारा असा सवाल दरेकर यांनी केला. या प्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडाळकर, माजी आमदर सुरेश हळवाणकर उपस्थित होते.

नक्की वाचा >> वर्षभरासाठी प्रयोग म्हणून कृषी कायदे लागू करु द्या, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही तर… : राजनाथ सिंह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 11:01 am

Web Title: bjp leader pravin darekar slams farmers protest in delhi scsg 91
Next Stories
1 युपीएकडे मोदींसारखे नेतृत्व आणि अमित शाह यांच्यासारखे राजकीय व्यवस्थापक नाहीत – शिवसेना
2 ईडीच्या नोटीशीवर एकनाथ खडसेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस?