राम मंदिराचे भूमिपूजन आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावलेल्या शरद पवार यांना आता भाजपाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्य़क्षा विजया रहाटकर यांनी उत्तर दिलं आहे. “घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांमुळे करोना बरा होणार आहे का?,” अशा शब्दांत त्यांनी पवारांना प्रतिटोला लगावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टार्गेट केले.

राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आज जाहीर झाली तसेच हे भूमिपूजन पतंप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान, राज्यात करोनाचा कहरही आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर “राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

पवारांच्या या विधानाला विजया रहाटकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. रहाटकर म्हणाल्या, “हो ना… तीन लाख रूग्ण व ११ हजार मृत्यू होऊनही घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे करोना बरा होणार आहे!, रूग्णांची हेळसांड व रूग्णालये लुटत असताना भांडणाऱ्या तिघाडी सरकारमुळे बरा होणार आहे!!, गरीबांसाठी एकही रूपयांची मदत जाहीर न केलेल्या नेतृत्वहीन सरकारमुळे बरा होणार आहे!!!”

करोना विषाणू फैलावाच्या परिस्थिती व सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार रविवारी सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी वरील भाष्य केले. करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी देशात टाळेबंदी लादली गेली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य व केंद्र सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी केली.