देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाला आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर केलं आहे. यातच आपण करोनाशी लढताना एकटे नाही. संपूर्ण देश एक आहे. आपल्याला अंध:कारातून प्रकाशाकडे जात करोनावर मात करायची आहे, असं म्हणत रविवारी ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून मेणबत्ती, टॉर्चचा प्रकाश करण्याचं आवाहन केलं. यानंतर राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी प्रतिक्रिया देत यामुळे संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाईल असं म्हटलं होतं. यावरून आता भाजपाचे नेते राम कदम यांनी ऊर्जामंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांशी किंवा अन्य तज्ज्ञांशी चर्चा न करता केवळ व्हाट्सअॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केले आहे. देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो की बंद करून झोपतो?यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो,” असं कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. रात्री दिवे बंद करून संध्याकाळी सुरू करतो तेव्हा ग्रीड कोसळते का? असा सवालही त्यांनी केला.