विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेणाऱ्या शिवसेनेचे राज्यातील सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रयत्न सुरूच असताना स्थानिक पातळीवर मात्र विधानसभेतील उखाळ्या-पाखाळ्या थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे. दुष्काळाने शेतकरी हैराण झाला असतानाच सत्तेतील व विरोधातील नेत्यांना याचे सोयरसुतक नसल्याचेही वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. उस्मानाबादचे शिवसेना खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना शनिवारी सकाळी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. भाजप जिल्हाध्यक्षाच्या घरी मंत्र्यांचा अल्पोपाहार सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन्ही पक्षांत एकमेकांविषयी काहीशी नाराजी असली, तरी असा काही प्रकार घडलाच नाही, असे सांगणाऱ्या खडसे यांनी ‘हे तर आमचे घरातले भांडण’ अशा शब्दांत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
विधानसभा निवडणुकीतील मतभेदांवरून गायकवाड यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी सकाळी मारहाण केली. मंत्री खडसे यांच्यासमोर गायकवाड यांच्याशी नेत्यांनी शाब्दिक बाचाबाची व शिवीगाळ केली. मंत्री खडसे मराठवाडय़ातील दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर असून, प्रशासनाकडून आढावा घेण्यास उस्मानाबाद दौऱ्यावर होते. तालुक्यातील सकनेवाडी येथील सरकारी कार्यक्रम आटोपून अल्पोपाहारासाठी भाजप जिल्हाध्यक्ष काळे यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले होते. खडसे यांच्यापाठोपाठ खासदार गायकवाड काळे यांच्या निवासस्थानी आले. मात्र, गायकवाड यांचे खडसे यांना भेटण्यासाठी काळे यांच्या निवासस्थानी येणे भाजपच्या काही नेत्यांना काही पटले नाही. त्यातूनच त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार संजय िनबाळकर खासदारांच्या अंगावर धावून गेले. गायकवाड यांची गचांडी धरीत त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळ उडाला. खडसे यांच्यासमोर हा प्रकार घडला.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांत मोठी कटुता निर्माण झाली आहे. त्यातून सत्तेचे बळ मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकत्रे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या बाबत खडसे यांना विचारणा केली असता, विधानसभा निवडणूक आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. त्यामुळे एकमेकांविषयी मनात थोडीशी नाराजी आहे. त्यावरून एकमेकांना प्रश्न विचारले गेले. शाब्दिक बाचाबाची होती. त्यात विशेष गांभीर्य नाही, असे सांगत प्रकारावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ‘अखेर हे आमचे घरगुती भांडण आहे,’ हे सांगण्यासही खडसे विसरले नाहीत.
वैफल्यातून भाजप नेत्यांची कृती – सुधीर पाटील
नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतरही भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे भाजपचे काही नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. याच वैफल्यातून हा गरप्रकार घडला. मात्र, शिवसेना अशा किरकोळ गोष्टींना गांभीर्याने घेत नाही. ज्यांचे समाजात काहीच योगदान नाही, ते आपल्याकडे लक्ष आकर्षति करण्यासाठी असे वाह्यात कृत्य करतात. त्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत. मात्र, या पुढील काळात भाजपकडून असे वर्तन घडल्यास शिवसनिक गप्प राहणार नाहीत, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी दिला.
मारहाण नाही, बाचाबाची – संजय निंबाळकर
खासदार गायकवाड यांना मारहाण केली, हे वृत्त चुकीचे आहे. विधानसभेतील मतभेदांवरून शाब्दिक बाचाबाची झाली, हे आपणास मान्य आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीनिशी शिवसेना उमेदवाराच्या विजयासाठी काम केले. विधानसभा निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो. त्यावेळी खासदारांनी सेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला असता तर आपण ब्र शब्दही काढला नसता. मात्र, त्यांनी भाजप, सेना दोन्ही पक्षांना डावलून तत्कालीन पालकमंत्री मधुकर चव्हाण यांना निवडणुकीत मदत केली. त्यावरून गायकवाड यांच्यासोबत बाचाबाची झाल्याचे तुळजापूर मतदारसंघातील भाजपाचे पराभूत उमेदवार संजय िनबाळकर यांनी सांगितले.