गेल्या काही महिन्यांपासन मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच सध्या हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे. न्यायालयानं काजूंरमार्ग येथील मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मुंबई मेट्रो आणि कारशेडच्या प्रस्तावित जागेवर भाष्य केलं. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला होता. यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

“अभिमान आणि अहंकार यात अंतर असतं. मुंबईबद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून आपण मुंबईकरांच नुकसान करत आहात. ज्या कांजूरमार्गचे समर्थन आपण करत आहात. त्या ठिकाणी कारशेड होण्यातल्या अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीने दाखवून दिले आहेत. कांजूरचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही.” असं उपाध्ये म्हणाले. मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाच्या प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे, त्यामुळे अन्यत्र लक्ष वेधण्यापेक्षा उद्धव ठाकरे सरकारने नेमलेल्या मनोज सौनिक सरकारचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आलं असतं, असंही ते म्हणाले.

“मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच आजच समाजमाध्यमावरील भाषण म्हणजे कृती आणि उक्ती यांच्यातल्या अतंराच उत्तम उदाहरण होतं. गेले वर्षभर सरकार विकास करत असल्याचा दावा त्यांनी केला व आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ जी चार उदाहरण दिली ती सर्व कामे मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता. इतकंच काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेनला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ट्य आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

“आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असं मुख्यमंत्री आपल्या संबोधनादरम्या म्हणाले होते.