‘राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केली, मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का नाही?,’ असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला केला होता. शरद पवार यांच्या प्रश्नाला भाजपाचे नेते आणि माजी महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. “शरद पवारांनी आयुष्यभर मतांची विभागणी केली. पवारांना मशिद बांधायची असेल तर त्यांनी पक्षातर्फे ट्रस्ट स्थापन करून मशीद बांधावी,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. याबरोबरच मुनगंटीवार यांनी छगन भुजबळांनाही टोला लगावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टच्या अध्यक्षांसह विश्वस्तांची नेमणूकही केंद्र सरकारनं केली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टप्रमाणेच बाबरी मशिदीसाठीही ट्रस्ट स्थापन करायला हवा होता, असा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं.
मुनगंटीवार म्हणाले,”आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे विभागणी केली. खुर्चीसाठी पक्ष फोडला. पवारांनी त्यांच्या पक्षातर्फे ट्रस्ट करावा आणि मशीद बांधावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन झाला आहे. आरोप करण्याचं काहीच कारण नाही,” असं मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार भुजबळांना काय म्हणाले?

भाजपाची सूज उतरू लागली आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला होता. या विधानाचा मुनगंटीवारांनी समाचार घेतला. “दोन तीन नगरसेवक गेले म्हणून तारे तोडण्याचं कारण नाही. सत्ता गेल्यानंतरही धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे जे गेले ते भाजपाचे नव्हते. दोन तीन मंडळी भाजपातून गेल्यानं तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यापेक्षा राज्याच्या सेवेचे काम करण्याकडे लक्ष द्यावे,” असं मुनगंटीवार म्हणाले.

आणखी वाचा – एल्गार परिषद : केंद्राला माहिती देणारा ‘तो’ खबऱ्या कोण?; पवारांचा सवाल

सरकारमध्ये असूनही विरोधकांसारखी भूमिका –

एल्गार परिषदेचा तपास केंद्रानं एनआयएकडे दिला आहे. त्यावरूनही मुनगंटीवार यांनी पवारांना उत्तर दिलं. पोलीस केंद्राला माहिती देत असतील तर या प्रकरणात नक्कीच काही गंभीर नाही. पोलीस तुमचं ऐकत नाहीत मग सरकारमध्ये तुमची भूमिका काय? सरकार यांच असूनही हे विरोधी पक्षांसारखे वागत आहे, याचं आश्चर्य वाटतं, असं मुनगंटीवार म्हणाले.