“देशात व राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण आपल्याकडे करोनाचा बाऊ केला जात आहे. करोना हा व्हायरस आहे. इतर आजारातूनदेखील लोकांचा मृत्यू होतो. लोकांना घाबरवू नका. लोकांना वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल. ज्या पद्धतीने स्वीडनने लोकांची सामाजिक रोग प्रतिकार शक्ती (हर्ड इम्युनिटी) वाढवली त्या पद्धतीने भारतात केली जावी,” असे मच भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी सांगितले. “करोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे. करोनाला घाबरू नका,” असंही ते म्हणाले. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सातारा जिल्हा बँकेत जाऊन बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“करोनाचा बाऊ करण्याची गरज नाही. आतापर्यंत अनेकांना कोरोना होऊनही गेलेला असेल. असे अनेक व्हायरस देशात असून साधारण तीन अब्ज व्हायरस जगात आहेत. लोकांनी घाबरून जाण्यापेक्षा वस्तूस्थितीला सामोरे जावे. बंदमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्या चोरमाऱ्या वाढणार आहेत. लोक काम करायला इच्छुक आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी आणि काम करावे. यावर नक्की लस निघेल असे सांगता येत नाही. पुणे येथील सायरस सिरम इन्स्टिट्युटमध्ये लस निर्माण करण्यासाठी ऑक्सफर्डचा मदतीने संशोधन सुरू आहे,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…

“जेवढे मृत्यू विविध आजारांनी, सीमेवर आणि वृद्धावस्थेमुळे झालेत. त्यापेक्षा दहापटीने अधिक मृत्यू रस्ते अपघातात झालेत. त्यामुळे शांत राहा. आता लोक काम करायला तयार आहेत. विविध राज्यातून आलेले कामगार होते, ते ही परत येत आहेत. प्रत्येकाला आपली प्रतिकार क्षमता वाढवावी लागणार आहे. गोव्यात मी महिनाभर होतो, तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी माझी भेट झाली. करोना काळात येथून गेलेले कामगार परत येत आहे. कारण त्यांना तिकडे रोजगार नाही,” असंही ते म्हणाले. “करोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे. घाबरू नका. सॅनिटायझर किती लोकांना पुरवणार. देशाची लोकसंख्या लक्षात घेता ते पुरवू शकत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. “कोणी कोणाबद्दल काय बोलले ते मला विचारून बोलले नाहीत. माझं मत मी परखंडपणे मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील,” असेही उदयनराजे यांनी सांगितले.