राज्यसभेत कृषी विधेयकावरुन गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक दिवसांसाठी अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं होतं. उपसभापतींच्या वर्तनाच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी एक दिवस उपोषण केले, त्याला शरद पवार यांनीही एक दिवस अन्नत्याग करून समर्थन दिलं होतं. दरम्यान भाजपा नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांवर टीका केली असून मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं, तर अधिक बरं वाटलं असतं असं म्हटलं आहे. टीव्ही ९ ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

कृषी विधेयक म्हणजे मोदी सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आहे असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांसारख्या नेत्याने विरोधासाठी विरोध करणं शेतकऱ्यांना पटलेलं नाही असं विनोद तावडे यांनी सांगितलं. शरद पवारांना काही बदल सुचवायचे होते तर त्यांनी राज्यसभेत ते मांडणं गरजेचं होतं, सरकारने त्यांचं नक्की ऐकलं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- …तर मी स्वत: शरद पवारांच्या घराबाहेर ढोल वाजवणार – गोपीचंद पडळकर

“मराठा समाजाला कसं डावलायचं हे या सरकारला माहित असून शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं, तर अधिक बरं वाटलं असतं,” असा टोला विनोद तावडेंनी लगावला.

आणखी वाचा- राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही : अजित पवार

शरद पवारांनी काय म्हटलं होतं?
“राज्यसभेत कृषिविषयक विधेकांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांना काही भूमिका मांडायची होती, परंतु त्यांना बोलू न देता, आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करून घेणं, हे उपसभापतींचे वर्तन सभागृहाचं आणि त्या पदाचंही अवमूल्यन करणारे होते,” अशी टीका पवारांनी केली होती. राज्यसभेच्या उपसभापतींच्या या वर्तनाच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी एक दिवस उपोषण केलं, त्याला पवार यांनीही एक दिवस अन्नत्याग करून समर्थन दिलं होतं. “उपसभापती हरिवंशसिंग यांनी नियमांना महत्त्व न देता सदस्यांचे मूलभूत अधिकार नाकारले. पुन्हा जे सदस्य उपोषण करत आहेत त्यांना चहापान घेऊन ते गेले मात्र त्या सदस्यांनी त्यांचा चहापान नाकारला. चहाला हात पण लावला नाही ते बरंच झालं,” असेही पवार म्हणाले.