भाजप कार्यकर्त्यांमध्ये शरद पवार यांना विरोध करण्यासाठी आवश्यक ती सर्व रसद पुरवत स्व. गोपीनाथ मुंडे यांनी बांधणी केली. पवारांना विरोध किंवा त्यांचे समर्थन असे दोन गट निवडणुकीच्या मैदानात दिसायचे. आता पवार यांच्यावर टीका करावी तर कोणत्या तोंडाने अशा संभ्रमात भाजप कार्यकर्ते सापडले आहेत. पवारविरोधाची हवा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी काढून घेतल्याने मराठवाडय़ातील भाजपचे कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. याच राजकारणाचा भाग म्हणून ‘ओबीसी’ राजकारणाच्या बांधलेल्या महायुतीची वीणही काहीशी सैल झाली असल्याचे भाजपचे नेतेही मान्य करतात. ‘महायुतीमधील एक कडी तर निसटली आहे. राजू शेट्टी आता आमच्याबरोबर नाहीत. पण महायुतीमधील अन्य नेते आणि भाजप नेतृत्व यांच्यातील वीण अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या शिडात पवार विरोधाची हवा भरून गोपीनाथ मुंडे यांनी बांधणी केली. त्याला ‘ओबीसी’ एकत्रीकरणाचीही झाली होती. मात्र, विरोध करायचा कोणाला, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना मोठी पदेही देण्यात आली. त्यामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत. काही जणांनी ही नाराजी जाहीरपणेही व्यक्त केली आहे. फडणवीस सरकारचे मराठवाडय़ाकडे दुर्लक्ष असल्याची भावना सार्वत्रिक आहे. दुष्काळ, आरक्षण आणि शेती-प्रश्नावर सरकारला घेरले जात असल्याने निम कोट युरियाचे कौतुक किती वेळा सभांमधून करायचे, असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत. शरद पवार यांच्याशी शीर्षस्थ नेते सलगी करीत असल्याचा संदेश पद्धतशीरपणे जाहीर कार्यक्रमातून पोहोचला असल्याने स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या चुकांवरही पांघरूण घालावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे. महायुतीमधील बहुतांश घटक पवारविरोधी राजकारणाचा भाग म्हणून बांधले गेले होते. महादेव जानकर, राजू शेट्टी यांच्यामुळे ही अधिक टोकदार झाली. आता निवडणुकीमध्ये काय सांगायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चितळे समितीसमोर सिंचन घोटाळय़ातील बैलगाडीभर पुरावे देणारे कार्यकर्तेच आता सवाल करू लागले आहेत, ‘सिंचन घोटाळय़ावर प्रश्न विचारला सभेत एखाद्याने तर उत्तर काय द्यायचे?’ असा सवालही केला जात आहे.

मूळ गाभ्याचे प्रश्न सोडून बुथबांधणीसाठी दहा जणांना निवडा, असे सांगण्यात येत असल्यानेही नाराजी आहे. मराठवाडय़ातील परभणी, उस्मानाबाद, बीड जिल्हय़ात राष्ट्रवादी विरोधाचा सूर आता मावळू लागला आहे. परिणामी ‘ओबीसी’ राजकारणावरची भाजपची पकड ढिली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याला भाजप प्रदेशाध्यक्षांकडून होणाऱ्या नियुक्त्याही कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पूर्वी भाजपचे कार्यकर्ते पवारविरोधी गाडीचे चालक असायचे. मात्र आता तशी गरजच उरली नाही. त्यांचीही तेवढी ताकद राहिली नाही. भाजप वाढते आहे. यशही मिळते आहे. ओबीसीचे नेतृत्व पूर्वी मुंडेसाहेब करायचे. आजही अनेक नेते भाजपमध्ये आहेत. राम शिंदे, पंकजा मुंडे यांच्या रूपाने हे नेतृत्व भाजपबरोबर आहे. त्यामुळे त्यातील वीण ढिली झाली आहे, असे वाटत नाही.

      – दिलीप तौर, माजी जिल्हाध्यक्ष भाजप, जालना.