07 March 2021

News Flash

घुग्घुस पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

अपक्ष उमेदवार रंजिता आगदारी विजयी

( प्रतिकात्मक छायाचित्र )

अपक्ष उमेदवार रंजिता आगदारी विजयी

भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या स्वगावी घुग्घुस पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार रंजिता आगदारी या २,५५४ मते घेऊन विजयी झाल्या. जिल्हय़ात दारूबंदी आंदोलन छेडणाऱ्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या जाहीर सभेच्या करामतीने येथे भाजपला पराभवाची धूळ चारली आहे.

घुग्घुस हे भाजपचे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे गाव. आजवर या गावात भाजपची सलग सत्ता आहे. पंचायत समिती सदस्या शालू शिंदे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. भाजपच्या वतीने निळा चिवंडे यांना उमेदवारी देण्यात आली. ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी गेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार आशा आवळे यांना आयात करून काँग्रेसची उमेदवारी दिली, तर अपक्ष रंजिता आगदारी घुग्घुस नगर विकास आघाडी समर्थित उमेदवार होत्या. काँग्रेस व भाजपने येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत सभा घेतल्या, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या आगदारी या अपक्ष उमेदवारासाठी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या प्रणेत्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी जाहीर सभा घेतली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीची आज मतमोजणी झाली तेव्हा अपक्ष आगदारी यांनी २,५५४ मते घेऊन विजय मिळवला. काँग्रेस व भाजपचा उमेदवार अनुक्रमे आशा आवळे (१९०६) व निळा चिवंडे (१८१७) येथे पराभूत झाल्या. विशेष म्हणजे, आगदारी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यां आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी आवळे यांना उमेदवारी दिली. तसेच पक्षाच्या तीन निष्ठावंतांना निलंबित केले. त्याचाच परिणाम या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना जोरदार धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 4:06 am

Web Title: bjp loss in by election
Next Stories
1 पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी
2 आश्वासनाच्या चित्रफिती दाखवत ‘हल्लाबोल’मधून भाजपवर वार
3 नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही यंदापासून फेरपरीक्षेची संधी
Just Now!
X