नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ३७४ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने २१८ ठिकाणी जागा मिळवल्या. पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी या दोन गावात भाजपाला पराभव धक्का बसला. इतकेच नव्हे तर गडकरी यांचे मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथेही भाजपला पराभव स्विकारावा लागला.

नागपूर जिह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉँग्रेसने तुलनेने चांगले यश मिळवले. काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी बहुतांश ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. खासदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उषा ठाकरे विजयी झाल्या. तर नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्म गाव असलेल्या धापेवाडा येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे सुरेश डांगरे सरपंचपदी निवडून आले. धापेवाड्यात काँग्रेस समर्थित पॅनेलचे १६ तर भाजप समर्थित पॅनेलचा केवळ १ उमेदवार निवडून आला.

जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदान झाले.