काँग्रेसचे अस्तित्व आता संपत आले असून संपूर्ण देशभरात भाजप हाच आमचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे, असे वक्तव्य आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्राच्या संयोजक अंजली दमानिया यांनी केले. देशभरात कुठल्याही पक्षाशी युती करायची नाही, हे धोरण ‘आप’ने निश्चित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात महाराष्ट्राची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आपण अजित पवार, नितीन गडकरी या नेत्यांविरुद्ध लढणार असल्याचे दमानिया यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, आपण स्वत: नागपुरातून नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढणार नाही. किंबहुना, लोकसभेची निवडणूकच लढणार नाही, असे त्यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात स्पष्ट केले. नागपुरात ‘आप’ चा मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस की भाजप, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, १२८ वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व आता संपत आले आहे. नागपुरातच नव्हे, तर देशभरात आमची मुख्य लढत भाजपशी आहे. गडकरी यांच्याविरुद्ध आपण केवळ आरोप केले नव्हते, तर वस्तुस्थिती सांगितली होती. येत्या आठ दिवसात गडकरी यांच्याविरुद्ध काही कागदपत्रे आपण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या वेळेस ‘आप’ला इतर पक्षांची सोबत घेण्याचा विचार करावा लागेल. मात्र, महाराष्ट्रात ‘आप’ची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी युती होण्याची चर्चा फलद्रूप झाली नाही, याकडे लक्ष वेधले असता अंजली दमानिया म्हणाल्या, देशभरात कुठल्याही राजकीय पक्षाशी युती करायची नाही आणि कुणाला तशी इच्छा असेल तर त्या पक्षाने ‘आप’मध्ये विलीन व्हावे, हे आमचे धोरण ठरले आहे. हे न झाल्यास किमान त्यांच्या इच्छुक उमेदवाराने ‘आप’चे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारावे, ही आमची अट राहील.
राजू शेट्टी हे मोदी आणि गडकरींना भेटत असल्याचे पुरावे मिळाल्याने आम्ही त्यांच्याशी जुळवून घेतले नाही. शेट्टी हे दिल्लीत जाऊन केजरीवालांना भेटले होते, ही बातमी खोटी आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आमच्यासोबत यावे, ही आमची इच्छा आहे, परंतु पक्षाच्या धोरणामुळे त्यांना आमच्यात विलीन व्हावे लागेल, असे मत दमानियांनी व्यक्त केले.
‘आप’चा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय होत असतानाच पक्षाचे नेते सतत वादग्रस्त विधाने करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता दमानिया म्हणाल्या, दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी मिडियाबाबत केलेले वक्तव्य ही ‘आप’ची भूमिका तर नाहीच, पण त्यांची यापूर्वीची दोन वक्तव्येदेखील मला आवडली नव्हती. अर्थात, मिडियाच्या ‘आप’ कडून अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या हिरीरीने ‘आप’च्या चुका दाखवल्या जातात, तशा इतर पक्ष करत असलेल्या चुका का दाखवल्या जात नाहीत, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.
दिल्लीत सरकार स्थापन करायचे की नाही, याबाबत जनमत घेणे अनिवार्य असल्यामुळे ‘आप’ने ते घेतले. तथापि, प्रत्येक मुद्यावर अशारितीने जनमत घेणे शक्य नसल्याचे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेणार का, या प्रश्नावर, अण्णांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे आशीर्वाद घेऊन ‘आप’मध्ये येत असल्याचा दावा त्यांनी केला.
कुणीही उठतो आणि ‘आप’चा सदस्य होतो, याकडे लक्ष वेधले असता, कुठलाही राजकीय पक्ष कुणालाही प्राथमिक सदस्यत्व नाकारू शकत नाही, असे दमानिया म्हणाल्या. यामुळे नरेंद्र मोदी, रॉबर्ट वढेरा किंवा सोनिया गांधी हेसुद्धा आमच्या पक्षाचे सदस्य होऊ शकतात, असे विधान त्यांनी केले. मात्र, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व कुणालाही मिळत असले तरी गुन्हेगार, जातीयवादी आणि भ्रष्टाचारी यांना पक्षात जबाबदारी किंवा उमेदवारी दिली जाणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.