पुणे : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येथील एका पंचतारांकित हॉटेलात शुक्रवारी झालेली ‘गुप्त’ बैठक काही वेळाने ‘उघड’ झाली. त्यामुळे या गुप्त बैठकीची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली. या बैठकीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत तर्क-विर्तक सुरु असतानाच नंतर या बैठकीला ‘अधिकृत’ स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहर आणि जिल्ह्य़ातील विकास कामांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी ही अधिकृत बैठक होती तर ती विधानभवनात का झाली नाही आणि या बैठकीची पूर्वकल्पना अधिकाऱ्यांनाही का देण्यात आली नव्हती, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या चार वर्षांतील कामांची माहिती देण्यासाठी नितीन गडकरी यांनी शुक्रवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेनंतर त्या मजल्यावरून गडकरी हॉटेलच्या वरच्या मजल्यावर गेले. तेथे शरद पवार उपस्थित होते. गडकरी आणि पवार यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली. गडकरी यांच्याबरोबर तेथे आलेल्या आमदारांना गडकरी यांनी त्या मजल्यावरून बाहेर जाण्याची सूचना केली आणि नंतर भेटीचा गवगवा झाला. मात्र नंतर ही बैठक अधिकृत असल्याचा दावा करण्यात आला.

नागपूरच्या धर्तीवर राज्यात ब्रॉडगेज मेट्रो करता येईल का, तसेच पुणे ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पुरंदरला होणाऱ्या नव्या विमानतळाला सासवडसह जवळची रेल्वे स्टेशन थेट रस्त्याने जोडण्यात यावीत, असे पवार यांनी गडकरी यांना सुचविल्याचे सांगण्यात आले. गडकरी यांनीही समाजमाध्यमातून या भेटीला दुजोरा दिला. मात्र या माहितीनंतर अनेक प्रश्न विचारले जात आहेत.  ही भेट अधिकृत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र तसे असते तर गडकरी यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात या बैठकीचा उल्लेख करण्यात आला असता. विधानभवनात अधिकृत बैठक झाली असती. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि अन्य वरिष्ठ शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित राहिले असते. नागपूर मेट्रोबाबत या भेटीत चर्चा कशी काय झाली, तो विषय बैठकीत कसा काय आला, गडकरी यांनी तीन आठवडय़ांपूर्वी वर्तुळाकार मार्गाचा आढावा घेतला होता. पालखी मार्गाचे सादरीकरणही या वेळी झाले होते. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मग या भेटीत नक्की कशाची चर्चा झाली, असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत. शरद पवार शुक्रवारी सकाळी बारामतीमध्ये होते. ज्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली त्याच हॉटेलमध्ये पवार उतरले होते. त्यामुळे कोण कोणाला नेमकेकशासाठी भेटले, याबाबतही चर्चा रंगली आहे.

..अशीही चर्चा

शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घेतलेली उघड भूमिका आणि भाजपकडून सातत्याने होत असलेली युतीची मागणी या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर ही अराजकीय बैठक झाली का, अशीही चर्चा आहे.