बोरखेडी टोल नाक्यावर भाजप नेत्या, आमदार शोभा फडणवीस तर मनसर टोल नाक्यावर आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदार संघटनांच्या सदस्यांनी बुधवारी रास्ता रोको केला. आंदोलनादरम्यान टोल वसुली बंद होती. मात्र, हे आंदोलन केंद्र व राज्य शासनाविरोधात नसल्याचे शोभा फडणवीस यांनी स्पष्ट केले. कंपनीने टोल वसुली करूनही नाक्यांवर प्रसाधन, वैद्यकीय आदी मूलभूत सुविधाही नाहीत. वसुली पूर्ण झाल्याने टोल बंद व्हायला हवेत. मात्र, ही कंपनी मंत्र्यांचेही ऐकत नाही. ही कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात हे आंदोलन आहे.  जुन्या आघाडी सरकारने करार करून जनतेची कोटय़वधी रुपयांची वसुलीच्या रूपाने लूट करण्याची मुभा या टोल कंपन्यांना दिली आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला. उलट नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने वसुली पूर्ण झालेले चाळीस टोल नाके बंद केले असून अठरा बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.