भाजपाचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता धुळे महानगर पालिकेच्या रिंगणात अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा याही उभ्या आहेत. हेमा गोटे या महापौरपदासाठी लढणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे. भाजपाने अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महापालिका निवडणुकांमधून डावलले. यानंतर नाराज झालेल्या अनिल गोटेंनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

भाजपाने आपली फसवणूक केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. ९ डिसेंबरला धुळे महापालिकेची निवडणूक होणार आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे आणि भाजपा नेते व मंत्री सुभाष भामरे यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळेच गोटे यांनी राजीनामाही दिला होता. मात्र पक्षांमध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्त्वाखाली लढली जावी या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचे त्यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आणि दोन अटी मान्य झाल्याने राजीनामा मागे घेतल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले होते. मात्र आता नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाविरोधात गोटे यांनी दंड थोपटल्याचेच चित्र आहे.

अंतर्गत वादामुळे अनिल गोटे यांनी राजीनामा दिला होता. नामचीन गुंडांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्षात प्रवेश देतात. मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिल्याची वक्तव्ये करतात. भाजपचे केवळ सत्तेसाठी होत असलेले अध:पतन मन अस्वस्थ करणारे आहे. मतांची संख्या वाढ करण्याकरिता आम्ही गुंडांना प्रवेश देतो, असे दानवे सांगतात. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. आज ते हयात असते, तर तुम्ही असे धाडस केले असते का, असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देताना उपस्थित केला होता. आता त्यांनी थेट नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचेच जाहीर केले आहे.